logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज: पालखी मार्गावरील सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा...

आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देहू, आळंदी आणि सासवड येथून प्रस्थान करणाऱ्या संतांच्या पालखी सोहळा मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. पालखी मार्गावरील रस्ते, मुक्काम स्थळे आणि मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विशेष पावले उचलली आहेत. संपूर्ण पालखी सोहळ्यादरम्यान सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी डीवायएसपी (DySP) दर्जाच्या अधिकाऱ्यांची 'नोडल अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच, आळंदी येथील दर्शनबारी परिसरात सुमारे १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा अधिक कडक केली जाणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील इनामदार वाडा परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

देहू कॅन्टोन्मेंट परिसरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. सासवड येथील भुजबळ हॉटेल परिसरातील खड्डे भरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

आकुर्डी येथील पालखी मुक्कामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे आणि लोणी काळभोर येथे जर्मन हँगर, पाणी टँकर व स्वच्छता व्यवस्था गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज संस्थानांना प्रत्येकी एक स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, पालखी निरा नदीवर पोहोचण्यापूर्वी दोन दिवस आधी नदीत पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत. दिवे घाट परिसरात बॅरेकेटिंग आणि वीज पुरवठ्याची सोय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे केली जाईल.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, "पालखी सोहळा हा जगातील सर्वात शिस्तबद्ध धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. यामध्ये कोणतीही उणीव भासू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे."

या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि देहू, आळंदी व सासवड संस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या नियोजनबद्ध तयारीमुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

16
605 views

Comment