logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दीड लाख लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यातअटक वॉरंट टाळण्यासाठी अगोदर घेतले होते ५ लाख : पुणे शहर पोलीस दलात सलग तिसरी कारवाईपुणे : भ्रष्टाचार, हप्ते वस

दीड लाख लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात

अटक वॉरंट टाळण्यासाठी अगोदर घेतले होते ५ लाख : पुणे शहर पोलीस दलात सलग तिसरी कारवाई

पुणे : भ्रष्टाचार, हप्ते वसुलीबाबत अतिशय कठोर असणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खंडणीची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले असतानाच आणखी एका पोलीस हवालदाराला तब्बल दीड लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. आठवडाभरात पुणे शहर पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदारांवर करण्यात आलेली ही तिसरी कारवाई होती.

गणेश शहाजी कस्पटे (वय ४०, रा. शंकर सुमन हाइट्स, भेकराईनगर, फुरसुंगी) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार हे ज्या कंपनीत काम करतात, त्या कंपनीच्या मालकाविरुद्ध हैदराबाद न्यायालयात चेक बाऊन्सची केस सुरू होती. त्या प्रकरणात तक्रारदारांच्या मालकाविरुद्ध नॉन-बेलेबल वॉरंट जारी झाले होते. त्या वॉरंटची बजावणी न करण्यासाठी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गणेश कस्पटे याने यापूर्वी ३ मार्च २०२६ रोजी तक्रारदारांच्या मालकाकडून ५ लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारली होती.

त्यानंतर पुन्हा १ मे रोजी पोलीस हवालदार गणेश कस्पटे याने हे वॉरंट परत आल्याचे सांगून तक्रारदारांच्या मालकाला अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदारांचे मालक आजारी असल्याने तक्रारदार स्वतः गणेश कस्पटे याला भेटले. त्यावेळी त्याने तक्रारदारांच्या मालकाला हैदराबाद न्यायालयाच्या नॉन-बेलेबल वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी स्वतःसाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर २ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्याच दिवशी याची पडताळणी करण्यात आली. त्यात गणेश कस्पटे याने यापूर्वी मालकाला अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी ५ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करून पुन्हा २ लाख रुपयांची लाच मागितल्याचे, तसेच तडजोडीनंतर दीड लाख रुपयांवर व्यवहार ठरल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोट क्लब रोडवरील सुलक्स कल्पतरू गार्डन सोसायटीसमोर पानटपरीजवळ सापळा रचला. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना गणेश कस्पटे याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व सहकाऱ्यांनी केली. सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे पुढील तपास करीत आहेत.

*तक्रारदाराच्या छातीला घेतला चावा* - हवालदार गणेश कस्पटे याने यापूर्वी अटक टाळण्यासाठी तक्रारदारांच्या मालकाकडून ५ लाख रुपयांची लाच घेतली होती. त्यासाठी त्यांना अटक करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर पुन्हा अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. दरम्यान, दीड लाख रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी आपल्याला पकडल्याचे लक्षात येताच गणेश कस्पटे याने तक्रारदाराच्या छातीचा चावा घेतला. तसेच सापळा पथकाला धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

6
434 views

Comment