logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पोलीस खात्यातच भ्रष्टाचार: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा पगार घोटाळा; चौघांविरुद्ध गुन्हा, तिघांना बेड्या

पोलीस खात्यातच भ्रष्टाचार: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा पगार घोटाळा; चौघांविरुद्ध गुन्हा, तिघांना बेड्या

लातूर (प्रतिनिधी): 'रक्षकच भक्षक' बनल्याचा धक्कादायक प्रकार लातूर पोलीस दलात उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन वितरण प्रक्रियेत तब्बल २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

असा झाला घोटाळा (२०१५ ते २०२५)
प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपहार गेल्या १० वर्षांपासून (मे २०१५ ते मार्च २०२५) सुरू होता. आरोपींनी संगनमत करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत खालील बाबींच्या आधारे अफरातफर केली:
बनावट दस्तऐवज: वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड करून बनावट कागदपत्रे तयार केली.
अनधिकृत भत्ते: इन्सेंटिव्ह (Incentive), बेसिक एरिअर्स (Basic Arrears) आणि स्पेशल पे (Special Pay) यांसारख्या विविध वेतन शीर्षकांखाली जास्तीची रक्कम दाखवली.

स्वतःच्या खात्यात वळते: ही जास्तीची रक्कम शासनाकडून मंजूर करून घेऊन ती स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांवर वळवून घेतली. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी (उदगीर) श्री. गजानन भातलवंडे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये (कलम ३१८(४), ३१६(४), ३१६(५) व इतर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे:
१. राहुल गोविंदराव वागदरे (लिपिक)
२. ब्रिजकिशोर ठाकूर (लिपिक)
३. दत्तात्रय मारुती क्षिरसागर (लिपिक)
४. अजय दिगंबर सूर्यवंशी (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक)

लातूर जिल्हा पोलीस दलाने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. "या प्रकरणाचा निष्पक्ष व पारदर्शक तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल," असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सध्या अटकेत असलेल्या तीन आरोपींना १६ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लातूर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे करीत आहेत. या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

1
57 views

Comment