logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेवगावमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; अवैध मावा कारखान्यावर टाकला छापा!

शेवगाव (प्रतिनिधी): शासनाने बंदी घातलेला मावा आणि सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या सालवडगाव (ता. शेवगाव) येथील एका बेकायदेशीर कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मावा तयार करण्याच्या मशिन्स, कच्चा माल आणि दोन वाहनांसह तब्बल ३१ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २० मे रोजी शेवगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना सालवडगाव शिवारात अवैध मावा तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. खात्रीशीर माहिती मिळताच तपास पथकाने पंचांसह थेट सालवडगाव गावचे शिवार गाठले आणि छापा टाकला.
यावेळी इम्रान निसार शेख (वय २२) आणि सोहेल अफसर शेख (वय २१, दोघे रा. सालवडगाव) हे मशीनच्या साहाय्याने मावा तयार करताना मिळून आले. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता खालील मोठा मुद्देमाल हाती लागला:
मावा तयार करण्याच्या दोन मशिन्स (१,००,००० रु.)
विविध प्रकारची कच्ची व पक्की सुपारी, सुगंधित तंबाखू (अंदाजे १६ लाखांवर)
१३० किलो तयार मावा (१,०४,००० रु.)
महिंद्रा पिकअप गाडी आणि टाटा छोटा हत्ती (११,००,००० रु.)
इलेक्ट्रॉनिक वजन काटा व इतर साहित्य
(एकूण जप्ती: ३१,३८,०००/- रुपये)
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, हा सर्व माल मुजीब मुसा शेख आणि परवेज मुसा शेख (दोघे रा. शेवगाव) यांच्या मालकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत चंद्रकांत आंधळे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये चारही आरोपींविरुद्ध गुन्हा (रजि क्रमांक ४२७/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलबुर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष मुटकुळे, पोसई बाजीराव सानप, पोसई रामहरी खेडकर आणि त्यांच्या पोलीस अंमलदारांच्या पथकाने (किशोर काळे, भगवान सानप, शाम गुंजाळ आदी) केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोसई बाजीराव सानप करत आहेत.

60
1488 views

Comment