
देऊळवाडी गावाने पटकावला 'क्षयरोग मुक्ती अभियाना'चा रौप्य पुरस्कार
देऊळवाडी गावाने पटकावला 'क्षयरोग मुक्ती अभियाना'चा रौप्य पुरस्कार
लातूर: क्षयरोग (टीबी) मुक्तीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उदगीर तालुक्यातील देऊळवाडी गावास जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक (रौप्य पारितोषक) प्रदान करण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हे पारितोषक देऊळवाडी ग्रामस्थांना देण्यात आले.
राष्ट्रीय क्षयरोग मुक्ती अभियानांतर्गत आयोजित या स्पर्धेत देऊळवाडी गावाने आरोग्य विभाग आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने टीबी निर्मूलनासाठी भरीव कामगिरी केली. गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आणि स्थानिक जनतेच्या जागृतीमुळे टीबीच्या रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यास मदत झाली.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी देऊळवाडीच्या या कामगिरीचे कौतुक केले आणि इतर गावांनीही याच प्रकारे सहभाग घेऊन लातूर जिल्ह्याला टीबी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. या यशाबद्दल देऊळवाडी गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.