logo

*विशेष वृत्त* अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला मिळालं बळ ! अनुकंपाधारक उमेदवारांची शासनाप्रती कृतज्ञतेची भावना....



अहिल्यानगर, दि. ४ – शासकीय कर्मचाऱ्यांच्या अकाली निधनामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यानंतर या कुटुंबांचा उदरनिर्वाह केवळ पेन्शनवर चालू होता. अशा परिस्थितीत शासनाने जलद व पारदर्शक प्रक्रिया राबवून मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र वारसांना गट ‘क’ व गट ‘ड’ मधील पदांवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या दिल्या. यामुळे अनेक कुटुंबांचे शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न साकार झाले असून, “अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला बळ मिळालं. कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले,” अशा भावना उमेदवारांनी नियुक्तीपत्र स्वीकारताना व्यक्त केल्या.

अहिल्यानगर येथील शिवम प्रशांत झरेकर यांची कृषी विभागात कृषीसेवक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचे वडील आरोग्य विभागात कार्यरत असताना २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह पेन्शनवर चालू होता. “शासकीय नोकरी मिळाल्याने आता बहीण श्रेयशीच्या उच्च शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी समर्थपणे पार पाडता येईल. आईच्या आशा-आकांक्षाही पूर्ण करता येतील,” अशी भावना शिवम झरेकर यांनी व्यक्त केली. “पतीच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शासनाने तीन वर्षांच्या आतच माझ्या मुलाला शासकीय सेवेत स्थान दिल्याने मनापासून आनंद झाला,” असे त्यांची आई जयश्री झरेकर यांनी सांगितले.

भिंगार येथील विक्रम विठ्ठल केदार यांची पोलीस विभागात लिपिक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या वडिलांचे आचारी म्हणून कार्यरत असताना तसेच आईचेही २०२१ मध्ये कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मागे केवळ वयोवृद्ध आजी आणि भाऊ जिवंत आहेत. पालकांच्या उपचारासाठी कुटुंबाची संपूर्ण जमापुंजी संपल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. “शासकीय नोकरीमुळे आजीची शुश्रूषा आणि देखभाल सुलभपणे करता येईल,” असे विक्रम यांनी सांगितले.

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील जयदेव दीपक नन्नावरे यांची जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचे वडील वाहनचालक पदावर कार्यरत असताना २०२३ मध्ये मेंदू रक्तस्रावाने निधन झाले. त्यानंतर जयदेव हाताला मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होता, मात्र त्यात शाश्वती नव्हती. “शासकीय नोकरीमुळे आता जीवनात स्थैर्य आणि सुरक्षितता मिळेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

नाशिक येथील धनंजय नागेश निकम यांची कृषी विभागात लिपिक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचे वडील माहिती व जनसंपर्क विभागात शिर्डी येथे संदेशवाहक पदावर कार्यरत असताना २०२४ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. केवळ एका वर्षाच्या आतच धनंजयला शासकीय सेवेत स्थान मिळाले. नोकरीपूर्वी तो कपड्यांच्या दुकानात काम करत होता. “शासकीय नोकरीमुळे आर्थिक स्थैर्य लाभणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यातील गौरव बाळासाहेब गागरे यांची जामखेड येथे ग्रामविकास महसूल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचे वडिलांचे २०१२ मध्ये निधन झाले होते. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्याला ही संधी मिळाली. “आईने शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आता शासकीय नोकरीमुळे आर्थिक स्थैर्य मिळाल्याने तिची शिवणकामातून सुटका होणार आहे,” अशी भावना गौरव यांनी व्यक्त केली.

---

12
2909 views