राहुरी विधानसभा पोटनिवडणूक
उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन
प्रतिनिधी राविराज
अहिल्यानगर, दि. १० एप्रिल :- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपल्या इलेक्ट्रॉनिक जाहिरातींच्या प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समितीकडून त्यांचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या निवडणूक विषयक जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. यामध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क, यूट्यूब वाहिन्या, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, मोठ्या प्रमाणात पाठविले जाणारे संदेश, ध्वनी संदेश तसेच विविध संकेतस्थळांचा समावेश होतो.
सोशल माध्यमांसाठीही हेच नियम लागू असून फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, टेलिग्राम यांसारख्या माध्यमांद्वारे तसेच व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आणि ब्लॉगिंग संकेतस्थळांवर केल्या जाणाऱ्या प्रचारासाठी आयोगाच्या नियमांचे पालन करणे उमेदवारांना बंधनकारक आहे.
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समितीत जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, पोलीस निरीक्षक सायबर कक्ष, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी आणि अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार हे सदस्य आहेत. जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने जाहिरात प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे प्रमाणीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
हे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षामध्ये स्वीकारले जातील, अर्जासोबत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत तसेच उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रित प्रती जोडणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्पष्ट केले आहे.
#RahuriByeElection #MCMC #PankajAshiya #ElectionJahirat #MediaCertification #ElectionRules2026 #SocialMediaMonitoring #AhilyanagarUpdate #राहुरी_पोटनिवडणूक #जिल्हाधिकारी #निवडणूकआचारसंहिता